मुंबई -पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबाग म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. याठिकाणी असणाऱ्या प्राणी, पक्षी, झाडे आणि फुलांच्या विविध प्रजातींसाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे. राणीबागेत पेंग्विन आणि बारासिंगानंतर आता हिंस्र प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्टेरी तरसाची जोडी आणण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून हे तरस पर्यटकांना पाहता येणार आहेत.
राणीबागेच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ८५ टक्के विकासकाम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेत पेंग्विनचे आगमन झाल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. लवकरच याठिकाणी वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिंपाझी, शहामृग, इमू, कांगारु, आफ्रिकन हायना, बिबट्या, सोनेरी कोल्हा, अस्वल आदी देशी-विदेशी प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत. राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीच्या पंधरावड्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदर्शनीय भागात पर्यटकांना पाहण्यासाठी ते ठेवले जातील, अशी माहिती राणीबाग प्रशासनाने दिली आहे.