मुंबई :सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. याबाबत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवण्यासंदर्भात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती.
शिंदे सरकारने दिली स्थगिती : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाबळेश्वर येथील पर्यटन स्थळ अधिक विकसित करण्यासाठी बाजारपेठ परिसरात सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या कामाला शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन विकासाच्या कामाला खीळ बसत असल्याचा दावा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
कामांवरील स्थगिती उठवा :महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणी शिवसेना नेते व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीआहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री म्हणून अनेक बैठका देखील आपण घेतल्या आहेत.