मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांच्याविरोधात दिशा सालियनच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये ( Dindoshi Court ) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज दोन्ही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण झाला असून सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याबाबत बुधवारी ( दि. 16 मार्च ) निर्णय देणार आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्रांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने यापूर्वीच अंतरिम दिलासा दिला होता. कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावर रितसर सुनावणी सुरू होती. आज ( दि. 15 मार्च ) दिंडोशी न्यायालयात अडीच तासांच्या सुनावणीनंतर उद्या ( बुधवारी ) सकाळी 11.30 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय होणार आहे. मात्र, त्यापूर्वी नारायण राणे यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी तर मुंबई मालवणी पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियन कुटुंबियांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रीय लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.
मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशाच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी, अशी तक्रार दिशाची आई वसंती आणि वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यवाही अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
राणे पिता-पुत्रांसाठी पोलीस कोठडीची मागणी- मालवणी पोलीस ठाण्यात सालियनच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारी राणे पिता-पुत्रांची 4 तास चौकशी करण्यात आली. मात्र, राणे यांच्याकडून कुठलीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही आहे. राणे पितापुत्रांनी कोणत्या आधारावर आरोप केले आहे, त्यांच्याकडे काय सबळ पुरावे आहे ते सादर करण्याचे सांगितले. त्यानंतरही त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाही. राणे पिता-पुत्र चौकशीला सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राणे पिता-पुत्रांच्या पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी राणे पितापुत्रांसाठी पोलीस कोठडीची मागणी केली आज दिंडोशी सत्र न्यायालयात सांगण्यात आले.
हेही वाचा -Mumbai Police : पोलिसांनी खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई