मुंबई - विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या शिवसेना भाजपचा वाद अद्यापही मिटल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने जर स्वतंत्र सत्ता स्थापनेचा दावा केला, तर त्यांना काँग्रेसकडून पाठबळ मिळू शकते. काँग्रेस सेनेला साथ देणार का? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या ( शुक्रवारी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा हात सेनेच्या डोक्यावर ठेवला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सुत्राकडून मिळाली आहे.
काँग्रेसचा 'हात' शिवसेनेच्या डोक्यावर? काँग्रेस नेते उद्या सोनियांच्या भेटीला - काँग्रेसचे नेते सोनिया गांधीच्या भेटीला
मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-सेनेत मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थिती शिवसेनेने जर स्वतंत्र सत्ता स्थापनेचा दावा केला, तर त्यांना काँग्रेसकडून पाठबळ मिळू शकते. काँग्रेस सेनेला साथ देणार का? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या ( शुक्रवारी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून ७ दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. तर दुसरीकडे सेनेसोबत त्यांची अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू असल्याने राज्यात सेना-भाजपसोबत राहून सत्ता स्थापन करेल असे चित्र तुर्तास दिसत नसल्याने त्यासाठीचा लाभ घेण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उद्या दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. शिवसेनेने जर सत्तास्थापनेचा दावा केला तर त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायचा की सत्तेत सहभागी व्हायचे याविषयीची चर्चा सोनिया गांधी यांच्यासोबत केली जाणार आहे. त्यांच्या आदेशानंतर काँग्रेस आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येते.
आज मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्याचा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे बैठकीपूर्वीच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक येतील आणि त्यानंतर यासाठीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. ही बैठक केवळ स्वागत आणि आमदारांच्या परीचयानंतर संपली. त्याच दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात होती. तर त्याच दरम्यान शिवसेनेने आपला विधानमंडळ नेताही जाहीर केला. मात्र, सत्तास्थापनेसाठी सेनेने कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसकडून उद्या दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.