मुंबई- दोन डोस, आरटीपीसीआर चाचण्यांच्या जाचक अटीचे विघ्न कायम असताना, राज्य शासनाने कोकणासीयांना टोलमुक्त प्रवासाचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल माफीची घोषणा केली आहे. चाकरमान्यांना बाप्पा पावल्याचे बोलले जात आहे.
विविध उपाययोजनांसाठी झाली बैठक
पावसामुळे रस्त्यांची स्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये अत्यंत बिकट आहे. गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात टोल नाक्यांवर वाहनांची मोठी रांग लागलेली असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा परिस्थितीमध्ये कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) बैठक झाली.
काय कराल टोल फ्री प्रवासासाठी..?
कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा आज निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनाची माहिती ते रहात असलेल्या नजीकच्या पोलीस स्थानकात दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जातील. गणेशोत्सवाच्या 2 दिवसआधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसानंतर पर्यंत ही सेवा असेल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोकणात जाण्यासाठी काय आहेत नियम..?
- ज्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले, त्यांना कोकणात प्रवेश खुला असेल.
- 18 वर्षांखालील तरूण, बालकांना कोरोनाची लस नसल्याने त्यांनाही कोकणात प्रवेश असेल.
- 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केलेले प्रमाणपत्र असल्यास त्या चाकरमान्यांनाही कोकणात प्रवेश दिला जाईल.
- ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी केली नसेल, त्यांची जिल्ह्यांच्या सीमेवर त्वरीत कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास तत्काळ जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.
- या कोरोना चाचणीत चाकरमान्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्याला कोकणात प्रवेश करता येणार नसून संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल.
हेही वाचा -चंद्रकांतदादांना बाबासाहेब पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू - संजय राऊत