आज दिवसभरात या घडामोडींवर असणार खास नजर
- शिवसेनेचा आज दसरा मेळावा
मुंबई - सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही पार पडणार आहे. मात्र त्यावर कोरोना नियमांवलीचे निर्बंध असल्याने विजयादशमीला होणारा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता बंदिस्त सभागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.आज सायंकाळी हा दसरा मेळावा होणार आहे.
- राज्यभरात आज दसऱ्याचा उत्साह
मुंबई - हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे. तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
- आरएसएसचा आज विजयादशमीचा कार्यक्रम, सरसंघचालक करणार संबोधन
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण या उत्सवाच्या माध्यमातून संघ आपल्या संघटन कौशल्याचे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शन करत असतो. त्यामुळे संघाचा विजयादशमी उत्सव स्वयंसेवकांसाठी दिशादर्शक मानला जातो. सरसंघचालक आज स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत.
- पारंपरिक पद्धतीने आज कोल्हापुरात ऐतिहासिक शाही दसरा सोहळा पार पडणार
कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात सीमोल्लंघनाचा ऐतिहासिक दसरा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी याबाबतचे पत्रक काढून जनतेला माहिती दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
- धम्म चक्र प्रवर्तन दिन आज
नागपूर - ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी पवित्र दीक्षाभूमी सज्ज आहे. निळ्या पाखरांच्या थवे दीक्षाभूमीवर येण्यास सुरुवात झाली आहे. दीक्षाभूमी हे बौद्ध बांधवांचे सर्वात महत्वाचे आस्थाकेंद्र आहे. दीक्षाभूमी ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात स्थापित आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस होता विजयादशमीचा.
- पंकजा मुंडेंचा आज भगवान गडावर दसरा मेळावा
बीड - आज बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
- कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक करण्यात आल्याचे ट्वीट भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.