मुंबई- मान्सून देशभरात सक्रीय झाला आहे. उत्तर भारतात १२ दिवस आधिच दाखल झालेल्या मान्सूनचा आता आसाममध्ये कहर सुरू आहे.. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.. तर राज्यातील तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण झालेय... मुंबईतही आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे... यासह राज्य देशभरातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर..
गुवाहटी (आसाम)-राज्यातील पूर परिस्थितीमुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे रस्ते, पूल आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. आतापर्यंत एकूण 33 लोकांचा मृत्यू झालाय तर 24 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
वाचा सविस्तर - आसाममध्ये महापुरामुळे आणखी 7 जणांचा मृत्यू; 15 लाख लोकांना पुराचा फटका
रत्नागिरी-जिल्ह्यातल्या चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ही घटना झाली होती. धरण फुटीने धरण परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांची झोप उडाली होती. या दुर्घटनेत अनेक संसार उध्वस्त झाले, शेती वाहून गेली, होत्याचे नव्हते झाले. तो दिवस आठवला की आजही इथल्या ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडतो.
वाचा सविस्तर - ईटीव्ही भारत विशेष: तिवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...
मुंबई -आज (गुरुवारी) मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत (2 आणि 3 जुलै) मुंबईत मुसळधार तर कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
वाचा सविस्तर - आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
रत्नागिरी - तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या दुर्घटनेत कोणी आपला भाऊ गमावला, कोणी आई-वडील, कोणी मुलगा तर कोणी अख्ख कुटुंब गमावलं. अजित चव्हाण यांच्या तर संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातला. या दुर्घटनेत अजित चव्हाण यांनी आई-वडील, भाऊ, भावजय गमावली, चिमुकली पुतणी दुर्वा आजही बेपत्ता आहे. या सर्वांची उणीव नेहमी जाणवत असल्याचं अजित चव्हाण सांगतात, विशेष म्हणजे मोठ्या भावाचा मोठा आधार आपल्याला होता, पण आज तोही या जगात नाही, त्यामुळे आपला आधारच हरपल्याची भावना अजित चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
वाचा सविस्तर - ईटीव्ही भारत विशेष : तिवरे धरण दुर्घटना - 'दुर्वा आजही बेपत्ता, आठवणीने डोळे पाणावतात'
रत्नागिरी - जिल्ह्यातल्या चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 2 जुलै 2019 ची अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचे नव्हते झाले. भेंदवाडीतील 22 घरे, जनावरांचे गोठे आणि 22 जण या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते. या दुर्घटनेत एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले. मात्र, तेव्हा दीड वर्षांची असणारी दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले अरुण पुजारे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. या बातचित दरम्यान, त्यांनी आपण डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्याचे सांगितले.