मुंबई :राज्यातील मुंबई, पुणेसह अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणूका जवळपास वर्षभरापासून रखडल्या आहेत. अजूनही प्रशासक पालिकेचा गाढा हाकत आहेत. महविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आदेश दिले. मुदत संपलेल्या महानगर पालिकेवर प्रशासक नेमून सर्व कारभार त्यांच्या हाती दिल्याने त्यावर टीकाही झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभाग व सदस्यसंख्या पूर्ववत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, उर्वरित ९६ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करायचे की नाही, यासह अन्य मुद्द्यांवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
निवडणुका तातडीने मार्गी लागतील :राज्य निवडणूक आयोगाने वाढीव प्रभागसंख्येनुसार प्रभागरचनेचे काम पूर्ण केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत निर्णय होऊन या निवडणुका तातडीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. मुंबई, ठाण्यासह १४ महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेतील बदल आणि ९६ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या होत्या.