मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने शरद पवारांविरोधात तक्रार दाखल केली. पवारांनीही हीच संधी हेरत, ईडीच्या कार्यालयात आपण स्वत: जावून पाहूणचार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मरगळ आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उसळून उठले. राज्यभरात कार्यकर्ते ईडी आणि भाजप सरकार विरोधात त्वेशाने रस्त्यावर उतरले. शिवसेना ही पवारांच्या समर्थनार्थ पुढे आली. संपूर्ण माध्यमांचे लक्ष पवारांवर केंद्रीत झाले. त्यामुळे ही तक्रार राष्ट्रवादीच्यात पथ्थ्यावर पडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राजकारणात कधी काय करावे याचे अचूक टायमिंग साधण्यात शरद पवार माहिर मानले जातात. भाजप सरकार विरोधकांना संपवण्यासाठी ईडीचा वापर करते असा सर्रास आरोप होतो. त्यात थेट पवारांविरोधातच ईडीने तक्रार दाखल केल्याने भाजप सरकारच सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. राज्यात भाजप सेनेच्या बाजूने चित्र आहे. माध्यमांचेही लक्ष या दोनच पक्षांच्या भोवती फिरत आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर पवार केंद्र स्थानी आले आहे. संपूर्ण राज्यात पवारांचीच चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये या घटनेने जोश भरला आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार विरोधात आंदोलने होताना दिसत आहे. मुंबईतही कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सरकार सुडबुद्धीने कारवाई करत आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यात सध्या तरी राष्ट्रवादीला यश आले आहे.