मुंबई -आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र त्यात आज मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 8807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.
8807 नवीन रुग्ण -
आज राज्यात 8807 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 21 हजार 119 वर पोहचला आहे. तर आज 80 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 937 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.70 टक्के तर मृत्यूदर 2.45 टक्के आहे. राज्यात आज 2772 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 20 लाख 08 हजार 623 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 59 लाख 41 हजार 773 नमुन्यांपैकी 21 लाख 21 हजार 119 नमुने म्हणजेच 13.31 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 95 हजार 578 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 59 हजार 358 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण संख्या वाढली -
राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281, 21 फेब्रुवारीला 6971, 22 फेब्रुवारीला 5210 रुग्ण आढळून आले होते. त्यात काल 23 फेब्रुवारीला किंचित वाढ होऊन 6218 नवीन रुग्ण आढळून आले होते. आज 8807 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.