मुंबई- रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामासाठी आज सकाळी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, तर मध्य हार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावतील.
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर आज सकाळी ११.३० ते ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या दरम्यान सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान अप व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येईल.
कर्जत स्थानकातील फलाट क्रमांक एकवर असणारे एक झाड पाडण्यात येणार आहे. हे काम सकाळी १०.४० ते दुपारी १.४० पर्यंत करण्यात येईल. त्यामुळे ठाणे स्थानकातून कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या सकाळी १०.४८ आणि दुपारी १२.०४ वाजताची लोकल, कर्जत ते ठाणे दुपारी १.२७ आणि कर्जत ते सीएसएमटी १.५७ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.
आसनगाव ते कसारा अप व डाऊन मार्गावर गर्डर उभारण्याच्या कामासाठी सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक असेल. यामुळे या दोन स्थानका दरम्यान लोकल सेवा रद्द राहतील. मुंबई ते भुसावळ ते मुंबई एक्सप्रेस आणि एलटीटी ते मनमाड ते एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.