मुंबई :अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्याकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक देशद्रोही असल्याचे गंभीर आरोप केले होते. राज्यपालांच्या अभिभाषनानंतर दोन्ही सभागृहात कामकाजाला सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. सत्ताधारी आणि विरोधक यावेळी आमने सामने आले. विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी बोलू न दिल्याने विरोधक संतापले. वेलमध्ये उतरून त्यांनी सत्ताधारी आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळात दिवसभराचे कामकाज रेटून नेत अवघ्या तासाभरात आटोपले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत दुसऱ्या दिवशी विरोधकांना बाजू मांडण्यास संधी देणार असल्याचे सांगितले. आज दुसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा आक्रमक पवित्रा घेतील, अशी शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा गाजणार :दोन्ही सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात आज प्रश्नोउत्तराच्या तासाने होणार आहे. विधानभवनात एसटी कर्मचाऱ्यांना दहा वर्षांपासून रखडलेले निवृत्तीवेतनाचा मुद्दा मेघना बोर्डीकर उपस्थित करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांची अवहेलना नाही केली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात भाजपने सहा महिने आंदोलन छेडले होते. या मुद्द्यावरून विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.