मुंबई :बाळासाहेब ठाकरे! एक कणखर आवाज. हिंदूत्व या विषयाशी एकरुप होऊन राजकीय पटलावर दबदबा निर्माण करणारा सत्तेबाहेरील एक बलाड्य नेता. आज बाळासाहेबांची जयंती. महाराष्ट्राबाहेर या माणसाबद्दल आकर्षण होतेच. मात्र, महाराष्ट्रात या माणसाबद्दल असलेले वलय त्यांच्या निधनानंतरही कमी झालेले नाही, असे हे आगळेवेगळे रसायन. बाळासाहेबांच्या आवाजाने कित्येकांना राजकीय पटलावर सळोकीपळो केले होते. कारण, माझे शब्द बंदूकितील गोळीप्रमाणे आहेत. एकदा बाहेर पडले की पडले. पुन्हा माघारी नाही. मी एकदा बोललो ते बोललो अस सांगत ते मोठा घणाघात करत असत. आज त्यांची जयंती. दरम्यान, बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष मोठ्या प्रमाणात दुभंगलाय. मोठा गट आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, ते भाजपसोबत युतीत आहेत. हे सगळे पाहून आज बाळासाहेबांच्या जुन्या त्या भाषणाची आठवण झाली, ज्यामध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेतून बाहेर पडणारांसह भाजप-सेना युतीवर मोठे आसूड ओढले होते.
एकत्र का राहायाचे आहे? : शिवसेना या पक्षात राहून तुम्ही निवडणूक लढलात. आणि आता दुसऱ्यासोबत जाता. कोणत्या खासदाराला मारलं अशी बातमी आली. मग मारणार नाही तर काय पुजा करणार असे म्हणत बाळासाहेब म्हणाले, यानंतर जर कोणी शिवसेनेतून फुटला तर कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा असा थेट आदेशच त्यांनी या भाषणात दिला होता. तसेच, भाजपशी आमची युती आहेच. मात्र, मी भाजपला जरा जाहीर सांगू ईच्छितो. आपले भांडण हे खुर्चीसाठी नाही. ते कधीच नव्हते. आपल्याला एकत्र का राहायाचे आहे? ते म्हणजे फक्त काँग्रेसचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आपण एकत्र आहोत. सत्ता का हातात घ्यायची तर ती हिंदूत्व आणि लोकांची सेवा ताकदीने करता यावी यासाठी असही बाळासाहेब आपल्या भाषणात त्यावेळी म्हणाले होते.
वाद कोर्टात : सध्या शिवसेनेचे दोन गट पडलेत. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन शिवसेनेचा आपला एक वेगळा गट स्थापन केला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचा एक गट आहे. त्या गटामध्ये आज 56 आमदारांवरून फक्त 16 आमदार राहिले आहेत. तर, वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे आज भाजपसोबत मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांच्या सरकारने आता सहा महिने पुर्ण केले आहेत. दरम्यानच्या काळात शिवसेना कुणाची ते चिन्ह धनुष्यबान कुणाचे हा वाद सध्या कोर्टात आणि अनुक्रमे निवडणूक आयोगात आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद असून त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. या विषयावर काय निर्णय होतो हे येणाऱ्या काळात समोर येईलच. मात्र, आज पक्षाची जी अवस्था आहे त्यावरून बाळासाहेबांची आठवण आणि त्यांनी दिलेल्या भाषणांची जरूर वाच्यता होते.