महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2019, 6:14 PM IST

Updated : Dec 3, 2019, 10:18 PM IST

ETV Bharat / state

घातवार; दिवसभरात तब्बल पाच आत्महत्यांच्या घटना उघडकीस

मंगळवार हा घातवार ठरला आहे. कारण, दिवसभरात राज्यात पाच ठिकाणी आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

suicide
आत्महत्या

मुंबई- मंगळवार हा घातवार ठरला आहे. कारण, दिवसभरात राज्यात पाच ठिकाणी आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ठाणे, कोपरगाव आणि पुण्यात अशा एकूण पाच जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

कोपरगावात कॉलेज तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव -शहरात एका कॉलेज तरुणीने राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा संजय आरगडे असे या तरुणीचे नाव असून शहरातील वाणी सोसायटी येथील रहिवासी आहे. पूजा ही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयटीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होती. शिष्यवृत्तीसाठी (स्कॉलरशिप) तिने ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र, तो चुकीचा भरल्यामुळे तिला शिष्यवृत्ती भेटली नाही. फॉर्म चुकीचा भरण्याची तिची दुसरी वेळ असल्याने त्या नैराश्यातून तिने गळफास घेतल्याचे समजते. आत्महत्येमागे शिष्यवृत्तीचे कारण आहे की, अजून दुसरे काही कारण आहे, याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

पुण्यात पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या

पुणे- बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला मुलगा हा आजीसोबत राहत होता. मोबाईलवर गेम खेळणे आणि टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे त्याला व्यसन होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापासही झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन मोबाईल विकत घेतला होता. रविवारी रात्री त्याने मोबाईलवर गेम खेळत असताना आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घरात तो आणि आजी असे दोघेच राहत होते.

पुण्यात संशयास्पद अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

पुणे- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजसा शामराव पायाळ (वय.२६) असे मृत तरुणीचे नाव आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा - पुण्यात संशयास्पद अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तेजसा ही मूळची बीड जिल्ह्यातील निवासी आहे. ‘एमबीए’ पर्यंत तिचे शिक्षण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ती नोकरीसाठी पुण्यात आली होती. ती माणिकबागेतील एका सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन आपल्या आई व बहिणीसह राहत होती. आठवड्यापूर्वी तेजसा आपल्या आई आणि बहिणीसह बीडला गेली होती. मात्र, काही कामानिमित्त तेजसा तीन दिवसापूर्वी एकटीच पुण्यात परतली. सोमवारी सकाळी तिचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला. दरम्यान, ज्या घराच्या खोलीत तेजसाचा मृतदेह आढळला होता, त्या खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. खोलीत दारूच्या रिकाम्या बाटल्याही आढळल्या आहेत. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

आत्महत्येचा 'लाईव्ह' प्रयत्‍न; क्रेनच्या साहाय्याने व्यक्तीला वाचवण्यात यश

ठाणे - कळव्यात एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर स्वत:ला गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, शहर वाहतूक पोलीस आणि स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे क्रेनच्या साहाय्याने या व्यक्तीला वाचवण्यात यश आले. भगवान कांबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाल्याने मानिसक धक्क्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा - आत्महत्येचा 'लाईव्ह' प्रयत्‍न; क्रेनच्या साहाय्याने व्यक्तीला वाचवण्यात यश

हिंजवडीत कर्मचाऱ्याची आत्महत्या

पुणे- हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कपिल गणपत विटकर (वय-३९ रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते फोन रिसेपनिस्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नातेवाईकांनी मात्र कपिल यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस देखील त्या दिशेने तपास करत आहेत. घटनास्थळी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

Last Updated : Dec 3, 2019, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details