मुंबई -जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज (26 फेब्रुवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील माल वाहतुकीसह व्यापारी बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह राज्यातील 10 लाख वाहनांचा चक्काजाम होणार आहे.
राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने कॅटच्या मागण्यांना पाठिंबा देत संपात उतरणार असल्याची माहिती गुरूवारी दिली आहे. याउलट व्यापाऱ्यांच्या मागण्यांसह ई-वे बिलविरोधात आक्रमक झालेल्या माल वाहतुकदारांनीही शुक्रवारी वाहने बंद ठेवत देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. देशातील सात कोटी व्यापारी भारत बंदमध्ये सामील होतील. जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्यात, अशी संघटनेची साधी मागणी आहे. फूड सेफ्टी ऍक्टमधील चुकीच्या तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी, टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये या व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.