मुंबई -दरवर्षी रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला रक्षणाचे वचन देताना ओवाळणी म्हणून एक भेट किंवा पैसे दिले जातात. मात्र, यावेळी राज्याच्या दुर्गम भागांमध्ये सेवा देणाऱ्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी बहीण म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रक्षाबंधनाची भेट मागितली आहे.
ओवाळणी टाकायला पैसे नाही -
गेल्या वर्षभरापासून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे वेळेत होत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. कित्येक कर्मचारी, चालक व वाहक उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकणे, चहाची टपरी चालवणे, मजुरी करणे अशी वेगवेगळी कामे करत आहेत. काही एसटी कर्मचारी शेतमजूर म्हणूनही काम करताना राज्याच्या विविध भागात दिसून आले आहेत. यंदा दोन दिवसावर रक्षाबंधन असताना अद्याप एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे बहिणीकडे ओवाळणी टाकायला सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांकडे पैसे नाहीत. म्हणून एक लाख एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मोठी बहिण म्हणून वेतनावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आर्त मागणी केली आहे.
कर्मचारी झाले भावुक -
महिनाभर काम करुनही घरी भाजीपाला आणि किराणा भरायला पैसे नाहीत, अशी अवस्था राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांनी आपली सेवा बजावली आहे. ही सेवा बजावत असताना राज्यभरातील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. राज्याच्या मदतीसाठी धावून येणारे एसटी कर्मचाऱ्यांची आजपण सरकार दरबारी उपेक्षा का होते आहे?, दर महिन्याला ७ तारखेला वेतन होणे अपेक्षित असताना आज १४ दिवस उलटून सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा झालेले नाही. रविवारी रक्षाबंधन सण असून आम्हाला बहिणीला ओवाळणी टाकण्यासाठी पैसे नाही. आम्ही आपल्या बहिणीला काय देऊन?
असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या एका बहिणीच्या नात्याने भाऊ बहिणीच्या प्रेमाला समजू शकतात. तसेच आर्थिक अडचणीअभावी सण साजरा करू शकत नाही ही जाणीव त्यांना असेल या भावनेतून एसटी कर्मचाऱ्यांनी रश्मी ठाकरेंना वेतनासंदर्भातील मागणी केली.
रश्मी ताई माझ्या पप्पाच पगार वेळत करा -
जळगावच्या एका एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे वेतनासाठी साद घातली आहे. या दोन चिमुकल्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत एसटी कर्मचाऱ्यांची वेतनाचा प्रश्न मांडला आहे. त्यांनी सांगितले की, "रक्षाबंधना सणाला ताईला भेट वस्तू देण्यासाठी पप्पाकडे पैसे नाही. पैसे मागितले तर पप्पा बोलले की वेतन झाल्यावर देतोय. मात्र, आज २० तारीख आलेली आहे. तरी माझ्या वडिलांचा पगार झालेला नाही. त्यामुळे आम्ही रश्मी ताईला विनंती करतोय की, माझ्या पप्पांचा पगार वेळत करा."
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पुर्णपणे काेलमडले आहे. प्रवासी वाहतुकीतुन मिळणाऱ्या उत्पन्नाला काेराेनामुळे खीळ लागल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ऑगस्ट महिन्याचे १४ दिवस झाले तरी अद्याप जुलै २०२१ या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना आर्थिक संकटाला ताेंड द्यावे लागत आहे.
हेही वाचा -कोरोनानंतरही धोका कायम - डॉ. एम. देशमुख यांची खास मुलाखत
मदतीसाठी शासनाला प्रस्ताव -
गेल्या वर्षी कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या १ हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले होते. त्यानंतर सवलत मूल्याच्या रक्कमेतून ११०० काेटी असे एकुण २१०० काेटी रुपये दिल्याने जून महिन्यापर्यतचे पगार महामंडळाने अदा केले. मात्र, आता हा निधीसुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणखी प्रश्न निर्माण झालेला आहे.
राज्यात काेराेनाचे रुग्ण संख्या घटली असले तरी एसटीच्या सुमारे दहा हजार बस रस्त्यावर धावत आहेत. मात्र, प्रवाशांची संख्या काही वाढलेली नाही. त्यामुळे एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आता पुन्हा आर्थिक मदतीसाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ऑगस्ट महिन्याचे १४ दिवस झाले तरी अद्याप जुलै २०२१ या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना आर्थिक संकटाला ताेंड द्यावे लागत आहे.