मुंबई :कोल्हापुरात काल सोशल मीडियावर मुघल शासक औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पोस्टवरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोस्टमध्ये लोक औरंगजेब आणि टिपू सुलतानचे पोस्टर लावून जल्लोष करताना दिसत होते. यावरून येथे दगडफेकही झाली. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलक ठाम असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी दंगली : या सर्व घडामोडी पाहता आणि कोल्हापुरातील सध्याची परिस्थिती पाहता यामागे राजकीय फूस असावी, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडताना दिसत आहेत. या घटनांसाठी विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत आहेत. तर राज्यकर्ते परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद : 13 मे रोजी संध्याकाळी शहरातील एका समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या धार्मिक मिरवणुकीत 25-30 हून अधिक लोक सहभागी झाले होते. जेव्हा ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आली तेव्हा काही तरुणांनी मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवले आणि पायऱ्या चढण्यास मनाई केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सूचना फलकावर म्हटले आहे की, गैर-हिंदू मंदिराच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.