मुंबई - ब्रिटन आणि युरोपमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. परंतु याबाबत अधिक काळजी करण्याची आवश्यकता नसून राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात लसीकरणाची तयारी पूर्ण -
कोरोनाच्या या नव्या प्रकारबाबत गांभीर्यांने विचार करण्याची वेळ असून यासाठीच नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'नाईट कर्फ्यु' सारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच या व्हायरसबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरालॉजी येथे संशोधन सुरू असून लवकरच त्याचा अहवाल भारतील वैद्यकीय संशोधन संस्थेला सादर करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात लसीकरण करण्याची तयारी पूर्ण झाली असून आम्ही केंद्र सरकारच्या निर्देशांची वाट बघत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.