मुंबई : विमानतळामधे प्रवेश करताना फ्लाइटचे तिकीट आणि बोर्डिंग पासची तपासनी केली जाते. सी आय एस एफ अधिकारी फ्लाइट तिकीट आणि बोर्डिंग पास मॅन्युअली तपासत असतात. या प्रकारात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. गर्दी असेल तर अनेकवेळा रांगांमधे ताटकळत उभे रहावे लागते. प्रवाशांचा हा वेळ वाचवण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दीनापासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1 आणि 2 च्या प्रवेशद्वारांवर टूडी बारकोड रीडर लावण्यात आले आहेत. याद्वारे तिकीट पास स्कॅन केले जाणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते. तसेच याठिकाणी अनेक व्यापारी आणि औद्योगिक संस्थांची कार्यालये ऐतिहासिक इमारती तसेच चित्रपट श्रृष्टी आहे. यामुळे देश विदेशातील बिजनेसमन, पर्यटक नेते अभिनेते आदी प्रवासी विमानतळावरून ये जा करतात. यामुळे CSMIA मुंबई विमानतळावर सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सेवा वितरीत करण्यासाठी तसेच प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देवून एक चांगला आनंददायी प्रवासी अनुभव देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. आपली क्षमता वाढवून उत्कृष्ट व्यवस्थापन निर्माण करून विमानतळावरील पायाभूत सुविधा विकसित करण्यात मुंबई विमानतळ आघाडीवर राहिले आहे.