मुंबई :घाटकोपर परिसरातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या नील योग मॉलच्या किड्स झोनमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ( Toddler Dies Playing On Slide ) झाला. घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दालिशा करण वर्मा असे या साडेतीन वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ती चेंबूर येथील टिळक नगर येथे राहत होती.
नील योग मॉल :दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये ( Neel Yoga Mall ) रविवारी गेली होती. तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली. किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लूटत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याने तिला तात्काळ मुलुंड येथील फोर्टिस या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारापूर्वीच या चिमुकलीने प्राण सोडला.
अपघातात चिमुरडीचा मृत्यू :पंत नगर पोलिसठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली जेव्हा मुलगी दालिशा वर्मा तिच्या पालकांसह नीलयोग मॉलला गेली होती. घाटकोपर येथील नीलयोग मॉलमधील किड्स झोनमध्ये रविवारी झालेल्या या अपघातात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू ( Girl Dies In Accident ) झाला. स्थानिक पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कारण कुटुंबाने औपचारिक तक्रार दिली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
डोक्याला गंभीर दुखापत :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मॉलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या किड्स झोनमध्ये गेले आणि दालिशा तिथे खेळू लागली. ती स्लाइडवर आली आणि खाली सरकताना खाली पडली, त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत ( Head Injury) झाली. त्यानंतर वडील करण वर्मा यांनी तिला तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. दरम्यान, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पालकांनी कोणाच्याही विरोधात तक्रार दिली नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी एफआयआर नोंदवला नाही. सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे पंत नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविदत्त सावंत यांनी सांगितले.