मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेचे तब्बल तीन हजार कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार थंडावणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर काम करणार्या उर्वरित कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढणार आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारात निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवणे बंधनकारक असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे एक लाख ११ हजार कर्मचार्यांपैकी सध्या तीन हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या कामासाठी आरोग्य विभाग, किटक नाशक विभागासह सामान्य प्रशासन विभागातील शेकडो कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी चार हजार कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते.
हेही वाचा - 'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'