मुंबई - विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir Vidhan Parishad Candidate) यांना उमेदवारी दिल्याने व या निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याकारणाने आता वरळी या मतदारसंघात शिवसेनेचे ३ आमदार होणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेचे सुनील शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले. आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांना आमदारकी दिल्याने वरळीत ३ आमदार होणार आहेत.
वरळीत ठाकरे परिवाराचा पहिला विजय - १९६६ साली शिवसेनेच्या स्थापनेपासून कुणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. त्यासाठी ठाकरे कुटुंबीयांवर विरोधकांनी अनेक वेळा टीकाही केली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी मतदार संघाची निवड केली. १९९०, १९९५, १९९९, २००४ असे सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांचा पराभव करून वरळीतून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष, आमदार व माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरे यांचा वरळीतील निवडणुकीचा मार्ग सुकर केला होता. तेव्हा झालेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी ७९ हजार १९१ मतांनी विजय प्राप्त केला होता.
वरळी मतदार संघाचे काय आहे वैशिष्ट्य -वरळी मध्ये गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर होत्या. या परिसराला गिरण गावही म्हणायचे. गिरण्या बंद पडल्यानंतर वरळी मध्ये टोलेजंग इमारती, ५ स्टार हॉटेल्स, मल्टिप्लेक्स उभे राहिले व पुढच्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला. रेस कोर्स, आर्थर रोड जेल, सर्वात मोठा धोबीघाट इथे आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजरातमधले अनेक नागरिक या ठिकाणी राहायला आले आहेत. संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या या भागात बघायला भेटते. या भागात शिवसेनेच काम चांगल आहे. शिवसेनेची मतदार संघावर असलेली पकड व त्याच बरोबर सचिन अहिर व सुनील शिंदे यांचा मोठा चाहता वर्ग या मतदारसंघात असल्याने आदित्य ठाकरे यांना भविष्यात या मतदार संघात फार मोठा उपयोग होणार आहे. तसेच या विभागातील बीडीडी चाळींचा पुनर्विकास व मुंबई कोस्टल रोडला कोळी बांधवांचा असणारा विरोध हे दोन महत्त्वाचे मुद्दे या विभागात असून त्यामध्ये मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.