मुंबई - मुंबई महापालिकेतील नगरसेवक आमदार खासदार म्हणून निवडून जातात. नगरसेवक जेव्हा आमदार व खासदार म्हणून निवडून जातात अशावेळी त्यांनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे पराग शाह, समाजवादीचे रईस शेख आणि शिवसेनेचे दिलीप लांडे हे तीन आमदार नगरसेवक आणि आमदार असे दोन्ही मानधन घेत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
हेही वाचा -पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची सर्व नेते धावले, भाजपकडून मात्र राजकारण सुरूच -नवाब मलिक
तीन आमदारांना नगरसेवकांचे मानधन -
मुंबई महापालिकेतील जे नगरसेवक आमदार आणि खासदार म्हणून निवडून गेले आहेत अशा किती लोकांना पालिकेकडून मानधन दिले जाते, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून मागवली होती. त्यावर चिटणीस विभागाने अनिल गलगली यांस कळविले की, खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर, आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा 25 हजार रुपये मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रुपये भत्त्यासाठी, अशा केवळ चार सभांकरिता मानधन दिले जाते.