मुंबई: राज्यात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण वाढत असताना कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या एकूण 52 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. 25 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तीन महिलांची प्रसूती झाली असून त्यांच्या नवजात बालकांना कोरोना झाल्याचा संशय असल्याने त्यांचे आरटीपीसीआरचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
बालकांना कोरोनाचा संशय: मुंबईत गेले तीन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा एकदा हा प्रसार सुरू झाला आहे. सध्या मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात 35 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 19 रुग्ण सामान्य वॉर्डमध्ये दाखल आहेत. 5 गर्भवती महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. तीन महिलांची प्रसूती झाली आहे. या महिलांच्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे? का याची शहानिशा करण्यासाठी त्यांचे आरटीपीसीआर नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यावर या बालकांना कोरोनाची लागण झाली आहे का? याची माहिती समोर येणार आहे.