मुंबई- तब्बल 4 हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या पीएमसी बँकेच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. ऑडीट कमिटीचा सदस्य असलेल्या जगदीश मुखी, कर्ज वाटप कमिटीच्या सदस्य मुक्ती बावीसी, रिकवरी कमिटीचे सदस्य तृप्ती बने या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस
गेल्या काही दिवसांपासून या 3 आरोपींची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे या तिघांना मंगळवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा - हैदराबाद बलात्कार, दिव्यांग व्यक्तीने एकट्याने केला निषेध
दरम्यान, 4 हजार 355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले होते. ज्याचा फटका खातेदारांना बसला. खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.