महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संकटात बिल्डरही धावले मदतीला, व्यवसायिक इमारतीत बनवले 330 बेडचे कोविड सेंटर - एमसीएचआय-क्रेडाय न्यूज

कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. आता रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे बेड कमी पडत आहेत. हे पाहून आता मुंबईतील बिल्डर मदतीसाठी पुढे आले आहेत. मुंबईतील 3 बिल्डरांनी 330 बेड आपल्या व्यवसायिक इमारतीत उपलब्ध करून दिले आहेत.

Mumbai
Mumbai

By

Published : Apr 23, 2021, 1:40 PM IST





मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कित्येक पटीने वाढत असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. सरकारी यंत्रणा शक्य त्या परीने कोविड सेंटरच्या माध्यमातून बेड, आरोग्य सुविधा वाढवल्या जात आहेत. या संकट काळात बिल्डर सामाजिक भान ओळखत बृहन्मुंबई महानगर पालिका-सरकारच्या मदतीला धावले आहेत. एमसीएचआय-क्रेडायच्या तीन सदस्य बिल्डरांनी चक्क आपल्या व्यवसायिक इमारतीचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये केले आहे. तीन मोठ्या समूहांनी दहिसर, अंधेरी आणि वरळी येथे एकूण 330 बेड उपलब्ध करून दिले आहेत. मुंबईतील रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच आरोग्य यंत्रणांनाही मदत होणार आहे.

'या' बिल्डरांनी जपली सामाजिक बांधिलकी -

मुंबईत दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून दिवसाला 8 हजारापर्यंत नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर सक्रिय-गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शन मिळत नाहीत. अनेक रुग्ण बेड, ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्युमुखी पडत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत तीन बिल्डरांनी 330 बेड पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. मुंबईतील बडे बिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुस्तमजी, श्री नमन ग्रुप आणि अजमेरा ग्रुप यांनी आपल्या व्यवसायिक इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करत केले आहे. येथे बेड आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुस्तमजीने रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल दहिसर येथे 150 बेड तयार केले आहेत. श्री नमन ग्रुपने नेहरू विज्ञान केंद्र वरळी येथे 120 बेड तर अजमेरा ग्रुपने टाइम्स स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स अंधेरी पूर्व येथे 60 बेड उपलब्ध करून दिले आहेत.

मजुरांचे करणार लसीकरण -

सद्या आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता आमच्या तीन सदस्यांनी पुढे येत 330 बेड पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. यातून प्रेरणा घेऊन अन्य बिल्डरही पुढे येतील आणि आपल्या परीने मदत उपलब्ध करून देतील, असा विश्वास दीपक गोराडिया यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान एमसीएचआय-क्रेडायचे सर्व सदस्य आपापल्या साईटवरील सर्व मजुरांचे लसीकरण करून घेणार आहेत. तर त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details