मुंबई- कोरोनामुळे अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गवर जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. केरळच्या एका हॉटेलमधील काम कोरोनामुळे गेल्याने तीन तरुणांनी तब्बल 17 लाख रूपांची मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, या तिघांनाही रेल्वे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
हातावर पोट असलेल्या अनेक जण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. मात्र, आपल्या कुटूंबियांचे उदर्निवाह करण्यासाठी अनेकजण नोकरी शोधत आहे. काही तरुण चुकीच्या मार्गाने जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. केरळच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तिघा मित्रांनी पैशांची चणचण दूर करण्यासाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला होता. यातिघांनी हॉटेलच्या बाजूला असलेले एका मोबाईल दुकानात मोबाईल चोरी केली. त्यानंतर चोरी केलेले 28 मोबाईल वेगवेगळ्या बॅगमध्ये घेऊन मुंबईच्या दिशेने हे तिघे निघाले होते. यासंबंधित केरळमध्ये स्थानिक पोलिसांनी या चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता. तपासात हॉटेलमधील स्वयंपाक्याची चौकशी केली असता हे तिन्ही आरोपी केरळ सोडून गेल्याची माहिती मिळाली. तेव्हा केरळ पोलिसांनी या तिन्ही आरोपीचे आधार कार्ड आणि फोटो रेल्वे पोलिसांकडे पाठवून पनवेल रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
24 तासांत तिन्ही आरोपीना अटक
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींना शोधण्यासाठी रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तच्या मार्गदर्शनाखाली पनवेलच्या आरपीफ ठाण्याचे निरीक्षक जसबीर राणा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले. माहितीच्या आधारावर आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपीच्या फोटोवरून कसारा रेल्वे स्थानकात एक आरोपीची ओळख पटली. मात्र, हा आरोपी धावत्या रेल्वेतून उडी मारून पसार झाला होता. रेल्वे पोलिसांनी त्या आरोपीचे मोबाईल लोकेश ट्रेस करत एका कसारा घाटातील जंगलात पकडले आहे. तर दुसऱ्याला भुसावळ आणि तिसऱ्या आरोपीला इगतपुरीला पकडण्यात आले आहे. या तिन्ही आरोपीला अवघ्या 24 तासांत पकडण्यात आले आहे. मजीत सचिन विजेंद्र हूडा (वय 21 वर्षे), सूरज शेर सिंह धामी (वय 19 वर्षे) आणि आदि दुर्गा नेपाली (वय 24 वर्षे) असे आरोपीचे नाव असून हे तिन्ही आरोपी हे मुळचे दिल्ली आहेत.
जप्त मोबाईलची किमंत 17 लाख 27 हजार रुपये
या तिन्ही आरोपीच्या बॅगेतून पोलिसांनी एकूण 28 मोबाईल जप्त केले आहे. ज्यामध्ये 18 आयफोन, 7 वन प्लस, एक गूगल फिक्सेलच्या, एक एलजी आणि ओप्पोचा एक, असे एकूण 28 मोबाईलचा समावेश आहे. यांची अंदाजे किंमत 17 लाख 27 हजार 632 रुपये इतकी आहेत. पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून केरळच्या स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे अनुरक्षण गृहातील अनाथ मुलांना संस्थेत 2 वर्ष अधिक राहता येणार