मुंबई :10 जानेवारीला तक्रारदार रंजना वैभव राव या त्या शाळेत काम करणाऱ्या महिलेने बीकेसी पोलीस ठाण्यात येऊन कळविले की, धीरूभाई अंबानी शाळा सायंकाळी 4 वाजता सुटते. शाळा सुरु असते तोपर्यंत शाळेच्या कामाच्या संदर्भात जेवढे फोन येतात, ते लॅन्ड लाईनवरती घेतले जातात, परंतु शाळा सुटल्यानंतर लॅन्डलाईनवर येणारे सर्व फोन हे त्यांचे शाळेतील प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या चंद्रिका गिरीधर यांचे मोबाईलवर ट्रान्सफर होतात. त्यानुसार 10 जानेवारीला शाळा सुटल्यावर सायंकाळी 4.30 वाजता शाळेच्या प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या चंद्रिका गिरीधर यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून फोन करून सांगितले की, मैनें आपके स्कुल मे टाईम बॉम्ब लगाया है. असे सांगुन फोन कट केला.
फोन करून दिली माहिती :चंद्रिका यांनी फिर्यादी यांना संपर्क करून या बाबत माहिती दिली. काही वेळाने पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोन केला असता, तो कॉल शाळेच्या गेटवरील सुरक्षारक्षकाने होल्ड करून फिर्यादी रंजना वैभव यांना ट्रान्सफर केला असता, अज्ञात व्यक्तीने सांगितले की, त्याचे नाव झाला विक्रम सिंग असून तो गुजरातमध्ये राहतो. तसेच हे कृत्य केल्यावर पोलीस त्याला पकडतील, जेलमध्ये टाकतील, सोशल मिडीयात त्याचे नाव होईल, असे बोलुन फोन कट केला. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे शाळेतील सुरक्षा विभागाचे सर्व अधिकारी यांना सर्व हकीकत सांगितली व पोलीसांशी संपर्क केल्यावर बीडीडीएस पथका मार्फतीने शाळेचा परिसर तपासणी करून घेतली आणि त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाणेस गुरक १०/२०२३ कलम ५०५(१) (ब) ५०६ भादंवि प्रमाणे नोंद करण्यात आला.
आरोपीला गुजरात येथे अटक :गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ पोलीस पथक वरिष्ठांचे परवानगीने गुजरात राज्यात पाठविण्यात आले. परिमंडळ ८ कार्यालयाकडुन पोलीस पथकास तांत्रिक मदत देण्यात आली व तांत्रिक तपास करून आरोपीला जि. मोरबी, राज्य गुजरात येथून 11 जानेवारीला बीकेसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ताब्यात घेतले असुन या गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे. अटक आरोपीचे नाव विक्रमसिंग झाला वय ३४ वर्षे व्यवसाय चालक, जि. मोरबी, राज्य गुजरात असे आहे.