मुंबई - शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार नेहमी केली जायची. त्यावर उपाय म्हणून, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या २४ विभागांत वॉर रूम सुरू केले आहेत. तसेच, रुग्णांना कोणत्या रुग्णालयात कशा प्रकारे दाखल करायचे याबाबत कार्यपद्धती निश्चित केली आहे. यामुळे महापालिका तसेच खासगी रुग्णालये आणि कोरोना हेल्थ सेंटरमधील १८ हजार ७४४ पैकी ६ हजार ६२३ खाटा सध्या रिक्त आहेत. शिवाय आयसीयू, व्हेंटिलेटर, क्वारंटाइन सेंटरमध्येही हजारो खाटा रिक्त असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विविध कोरोना रुग्णालये व कोरोना उपचार केंद्रांमधील खाटांची एकूण क्षमता १२ हजार ४७८ इतकी आहे. यापैकी ९ हजार २९९ खाटांवर रुग्ण असल्याने ३ हजार १७९ खाटा रिक्त आहेत. कोरोना केअर सेंटर-२मध्ये सध्या ६ हजार २६६ खाटा उपलब्ध आहेत. यातील २ हजार ८२२ व्याप्त असून त्यापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ४४४ खाटा रिक्त आहेत. याशिवाय लक्षणे नसलेल्या आणि संशयित रुग्णांसाठी ठिकठिकाणी मिळून ३२४ ‘कोरोना केअर सेंटर-१’ मध्ये असलेल्या ४८ हजार ६४० खाटांपैकी सध्या फक्त १६ हजार ३५६ व्यक्ती या केंद्रांमध्ये असल्याने ३२ हजार २८४ खाटा रिक्त आहेत. प्रत्येक विभागासाठी सुरू केलेल्या वॉर रूमध्ये रुग्ण, संशयितांनी संपर्क केल्यास या ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन, दाखल होण्यासाठी आवश्यक केंद्र सुचवणे, अॅम्ब्युलन्स सुविधेबाबत मार्गदर्शन २४ तास केले जात आहे.