महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णा भाऊंच्या विचारांमध्ये समता प्रस्थापित करण्याची ताकद- बाळासाहेब थोरात

शाहू, फुले, आंबेडकर यांचा प्रभाव असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची देशाला गरज आहे. इथून पुढच्या कालखंडात त्याच विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 1, 2019, 9:27 PM IST

मुंबई - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत. आज संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. जातिभेद, विषमता संपवून समता प्रस्थापित करण्याची ताकद लोकशाहीरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरच्या सुमन नगर येथे अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शाहू, फुले, आंबेडकर यांचा प्रभाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची देशाला गरज आहे. इथून पुढच्या कालखंडात त्याच विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. राज्यघटना आणि लोकशाही टिकली पाहिजे, असे जर सर्वांना वाटत असेल तर, अण्णा भाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, विषमता संपवून समतेचे तत्व पुढे नेण्यासाठी अण्णा भाऊंचा विचार टिकणे महत्त्वाचे आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे काव्य महत्वाचे ठरले होते, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटी येथे अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details