मुंबई -दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोरोना लसीचा दोन मात्रा घेणाऱ्या प्रवाशांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लसवंतांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आले आहे.
लसवंतांना मोठा दिलासा -
गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020पासून रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवास करण्यासाठी लसवंतांना फक्त मासिक पास देण्यात येत होते. प्रवाशांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळत नव्हते. यामुळे लसवंत प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने लसवंतांना लोकलचे दैनंदिन तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित पत्रसुद्धा राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.