मुंबई - कोरोनाचा मार्च २०२० रोजी मुंबईत शिरकाव झाल्यानंतर झपाट्याने संसर्ग पसरला. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडली. या काळात तात्पुरत्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दिवस-रात्र सेवा दिली. कोरोना काळातील या सेवेसाठीचे प्रमाणपत्रही मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना देण्यात आले होते. ही सेवा बजावताना अनेकांना संसर्ग झाला. तर काहींचा मृत्यू झाला. कोरोनाची प्रभाव कमी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कायम सेवेत समावेश करून घ्यावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. नुकतीच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही हीच मागणी आयुक्तांना पत्र लिहून केली होती. आता आयुक्तांच्या घोषणेमुळे या कोरोना वॉरियर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
Corona Warriors: कोरोना काळाता मदत केलेल्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक होणार
मुंबईत कोरोना काळात रुग्णांवर उपचार करताना कर्मचारी कमी पडत होते. अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात नर्स, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. कोरोनाच्या महामारीदरम्यान सेवा देणाऱ्या १२०० कर्मचाऱ्यांना मुंबईत स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली जाणार आहे. या सर्व कोरोना काळात वॉरियर्सना स्वच्छता दूत म्हणून समाविष्ट करणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी केली आहे. त्याबाबतचे आदेशही देण्यात आल्याचे चहल यांनी सांगितले आहे.
मुंबई महानगरपालिका
५ हजार स्वच्छता दूत -संपूर्ण मुंबईत सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत पाच हजार स्वच्छता दूत नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे. या पाच हजार जणांमध्ये १२०० जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वांना कोरोना काळात दिलेल्या मानधना इतकाच पगार दिला देणार असल्याचे आयुक्तांनी कार्यक्रमात जाहीर केले आहे. या निर्णयामुळे नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांना मोठा दिलासा मिळाला आहे.