मुंबई - औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
हेही वाचा -दुचाकीची चक्क हातगाडीवरून मिरवणूकः इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे लक्षवेधी आंदोलन
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यात आला होता. तर, दुसरीकडे नामांतरावरून भाजपही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला. यात, जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजप आणि शिवसेनेला चिमटा काढत, दोन्ही पक्ष ५ वर्षे सत्तेत असताना त्यांना हा मुद्दा का सुचला नाही, अशी टीका केली.
थोरात पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.