मुंबई -व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खासगी माहिती गोळा करता यावी, हे सगळा प्रकार गंभीर आहे. केंद्रसरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणे आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणे हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
सोशल मीडियावर अंकुश लावण्याचा केंद्राचा प्रयत्न -
सोशल मीडियाचा वापर करतच भाजपा केंद्रात सत्तेत आली आहे. याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे. त्याच सोशल मीडियावर आज अंकुश लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनता केंद्रसरकारच्या विरोधात बोलत आहे. आपले म्हणणे प्रखरतेने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यावर अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.