मुंबई - लोकसभेच्या ४ टप्प्यातील राज्य आणि देशातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यामधील शेवटच्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया २९ एप्रिलला पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी ऐकमेकांवर टीकेच्या फैरी झाडल्या, तर अनेकांनी ऐकमेकांची पोलखोल केली. या प्रचाराच्या दरम्यान काही वाक्यांनी राज्यात आणि देशात चांगलाच धुमाकूळ घातला.
'लाव रे तो व्हिडीओ'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची चांगलीच पोलखोल केली. राज ठाकरेंनी मोदींचे २०१४ चे आणि आताचे व्हिडीओ दाखवत मोदींवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी त्यांच्या प्रत्येक सभेत हे व्हिडीओ दाखवत वेगळ्या पद्धतीने प्रचार केला. मात्र, त्यांच्या या 'लाव रे तो व्हिडीओ'ची सध्या राज्यभर जोरदार चर्चा होताना दिसतेय.
आमचं ठरलयं
कोल्हापूरच्या राजकारणातलं 'आमचं ठरलयं' या वाक्याची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भल्या भल्यांना कोल्हापूरचे राजकारण लवकर समजत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात कोड्यात टाकणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या. कोल्हापूरमध्ये पक्षाचे राजकारण कमी आणि गटाचे राजकारण मोठे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी मदत केली. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या विरोधात भुमीका घेत बंधू अमल महाडिक यांना मदत केल्याचे वक्तव्य सतेज पाटलांनी केले होते. तेव्हापासून महाडिक विरुद्ध पाटील असे राजकारण पेटले. त्यानंतर सतेज पाटलांनी 'आमचं ठरलयं' म्हणत धनंजय महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेत शिवसेनेचे उमेदावर संजय मंडलिक यांना बळ देण्याचे काम केले.