मुंबई: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, डेली नीड्स सुपर मार्केट दुकानातील डीप फ्रीजर तीन अनोळखी इसमांनी एका टेम्पो पिकअपमधून चोरी करून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे व पथक घटनास्थळी पोहोचले. डेली नीड्स दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यामध्ये 28 मे च्या रात्री एका टेम्पो पिकअप मधून तीन अनोळखी इसम आलेले दिसले. त्यांनी मिळून दुकानासमोरील डीप फ्रीजर टेम्पो पिकअपमध्ये टाकले व ते निघून गेले. या वाहनाचा क्रमांक सीसीटीव्ही फुटेजद्वारा प्राप्त करून नमूद नंबरचा तपशील मिळविण्यात आला. यानंतर नमूद टेम्पो चालकाचा वसई येथे जाऊन शोध घेतला.
अशी केली आरोपींना अटक:गुन्ह्याच्या तपासादरम्यान टेम्पो चालकाला ऑनलाईन पोर्टर या ॲपद्वारे एक फ्रीजर बोरिवली वरून नालासोपारा येथे नेण्यासाठी भाडे मिळाले. म्हणून तो बोरिवली येथील घटनास्थळी आला. तेथे दोन इसम त्याला भेटले व त्यांनी त्यास हा फ्रिजर नालासोपारा येथे घेऊन जायचे असल्याचे सांगितले. त्याने त्यांना फ्रिजर उचलण्यास मदतही केली. त्याने दिलेल्या माहितीवरून आरोपींचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांचे लोकेशन शोधल्या गेले. यानंतर नमूद टेम्पो चालकासह नालासोपारा पश्चिम (जिल्हा पालघर) येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्यांंच्याकडून चोरी झालेला डीप फ्रीजर हस्तगत करून आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.