ठाणे:रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पूजा श्रीकांत आंधळे (वय २७) ह्या मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमी प्रमाणे पोलीस ठाण्यात जाण्यासाठी ३ मे रोजी ११ वाजल्याच्या सुमारास लोकलने महिला डब्ब्यात प्रवास करीत होत्या. त्याच लोकलने चोरटा प्रवीणही प्रवास करीत होता. त्यातच कल्याण रेल्वे स्थानकातील ७ नंबर फलाटावर असलेली लोकल 'सीएसएमटी'च्या दिशेने जाताना कल्याणला थांबली होती. त्यावेळी पूजा ह्या दरवाज्यात उभ्या राहून प्रवास करीत होत्या. लोकल पुढील स्थानकात जाण्यासाठी निघताच चोरट्याने महिला कॉन्स्टेबलच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.
सीसीटीव्ही कॅमऱ्यात चोर कैद: या प्रकरणी पूजा आंधळे या महिला कॉन्स्टेबलने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने कल्याण रेल्वे पोलिसांनी ७ नंबर फलाटावरील सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला. याच दरम्यान गुप्त बातमीदाराने रेल्वे पथकाला चोरट्याची ओळख पटवून तो अंबरनाथ पूर्वेकडील पंचशीलनगर राहत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्याला अंबरनाथ मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मंगळसूत्र चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.