मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (२६ सप्टेंबर) भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर राऊत आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही भेटीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहे. अशात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी परिस्थिती असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील अशी परिस्थिती, चंद्रकांत पाटलांचा दावा - चंद्रकांत पाटील
राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहे. अशात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी परिस्थिती असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही. भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी, अशीही परिस्थिती नाही. पण, आगामी कुठलीही निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे, असेही पाटील म्हणाले. तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. सरकारचे याकडे लक्ष नाही. त्याचबरोबर, राज्यातील शेतकरीही अडचणीत आहे. रोजगार नसल्याने कामगारांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील समस्यांना सरकारने गंभीरतेने घ्यावे. सरकारने लोकांना मदत करावी, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा-'महानगरपालिकेच्या ठेवी मोडून मुंबईतील पूरग्रस्तांना सरकारने मदत करावी'