महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस आणि माझी कोणतीही गुप्त बैठक झाली नाही; उदय सामंतांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त बैठक झाली असल्याचे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले होते. मात्र, आपली अशी कोणतीच गुप्त बैठक झाली नसल्याचे सांगत या बैठकीबाबत उदय सामंत यांनी या आरोपाचे खंडण केले आहे.

secret meeting between uday samant and Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस आणि माझी कोणतीही गुप्त बैठक झाली नाही; उदय सामंतांचे स्पष्टीकरण

By

Published : May 25, 2021, 4:15 PM IST

Updated : May 25, 2021, 4:40 PM IST

मुंबई -भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. या आरोपाला उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर आले असताना योगायोगाने रत्नागिरी शासकीय विश्रामगृहामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली, पण ती सर्वांसमोर झालेली भेट होती, असे उदय सामंत म्हणाले. तसेच देवेंद्र फडवणीस आणि माझी भेट झाली याला सहा दिवस उलटून गेले. त्यानंतर अशाप्रकारे ट्विट का करण्यात आले? याबाबत उदय सामंत यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्या मंडळींना कोकणाने नाकारले त्यांनी अशा प्रकारे ट्विट करणे हे राजकीय संस्कृतीत बसत नाही, असा टोला नाव न घेता उदय सामंत यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.

ती सर्वांसमोर झालेली भेट -

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना, रत्नागिरी देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त बैठक झाली असल्याचे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले होते. मात्र, आपली अशी कोणतीच गुप्त बैठक झाली नसल्याचे सांगत या बैठकीबाबत उदय सामंत यांनी या आरोपाचे खंडण केले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा होता. या पाहणी दौऱ्या दरम्यान देवेंद्र फडणवीस रत्नागिरीत आले होते. तेव्हा मी रत्नागिरीत होतो. योगायोगाने रत्नागिरी शासकीय विश्रामगृहामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली, पण ती सर्वांसमोर झालेली भेट होती, असेही उदय सामंत म्हणाले.

ही भेट दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर -

देवेंद्र फडवणीस आणि माझ्या मध्ये भेट झाली, त्यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असे मिळून जवळपास दोनशे कार्यकर्ते त्या विश्रामगृह परिसरात होते. त्यामुळे या भेटीला गुप्त भेट बोलावे का, असा देखील प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीनुसार इतर पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट ज्यावेळी भेट होते, त्यावेळी विचारपूस करणे महाराष्ट्राचा राजशिष्टाचार आहे. तो मी निभावला असे स्पष्टीकरण देखील उदय सामंत यांनी दिले.

सहा दिवसाने ट्वीट का -

देवेंद्र फडवणीस आणि माझी भेट झाली याला सहा दिवस उलटून गेले. त्यानंतर अशाप्रकारे ट्वीट का करण्यात आले? याबाबत उदय सामंत यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच ज्या मंडळींना कोकणाने नाकारले त्यांनी अशा प्रकारे ट्वीट करणे हे राजकीय संस्कृतीत बसत नाही, असा टोला देखील नाव न घेता उदय सामंत यांनी निलेश राणे यांना लगावला. या ट्विटने मला राजकीयरित्या अस्थिर करण्याचा हेतू आहे. अशा ट्विटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वास माझ्या वरुन उडेल, असा जर कोणाला वाटत असेल, तर तो त्यांचा बालिशपणा आहे. अशा औपचारिक भेटीला गुप्त भेट म्हणून कोण सांगत असेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घातले पाहिजे, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल

Last Updated : May 25, 2021, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details