मुंबई -विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांतील अंतिमवर्षाच्या परीक्षांवरून सुरू असलेले राजकारण हे निंदनीय आहे. या राजकारणामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. राजकारण करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन परिक्षांच्या निर्णयावर एकमत करावे, अशी मागणी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) केली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेवर राजकारणापेक्षा एकमत व्हावे; एसआयओ विद्यार्थी संघटनेची मागणी - SIO Letter to Governor
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेवटच्या वर्षाच्या परिक्षांबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राजकारण करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन परिक्षांच्या निर्णयावर एकमत करावे, अशी मागणी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) केली आहे.
राज्यपाल आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असलेल्या भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकारला संघटनेने एक पत्र लिहून परिक्षांच्या मुद्द्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षांच्या विषयावर पक्षपातीपणा न करता सर्वसहमतीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे संघटनेचे दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद सलमान यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे संकट हे जागतिक स्तरावरील आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आणि आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. परीक्षांसंदर्भातील कोणताही निर्णय त्याच अनुषंगाने घ्यावा. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास शैक्षणिक संस्था जुलैच्या मध्यापर्यंत पुन्हा सुरू होतील. असे असल्यास कोणतीही परीक्षा रद्द केली जाऊ नये. मात्र, कोरोनाची परिस्थीती अशीच राहिल्यास सर्व परीक्षा रद्द कराव्यात आणि सरासरी गुणांच्या आधारे निकाल लावण्यात यावा, अशी मागणीही सलमान यांनी केली आहे.