मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मुंबईत २०११ च्या जनसंख्येच्या नोंदी प्रमाणे १ कोटी ३० लाख नागरिक आहेत. त्यामधील ९४ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सरकाराने पालिकेला दिले होते. पालिकेने १ कोटी ८ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांना लसीचा पहिला, ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे अशी आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
८३ लाख नागरिक बूस्टर डोसपासून वंचित -मुंबईमध्ये लसीचा पहिला आणि दोन्ही डोस घेण्यासाठी नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. मात्र बूस्टर डोसला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला नाही. मुंबईमध्ये ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यापैकी केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. अद्यापही ८३ लाख ५९ हजार ९६३ नागरिक बूस्टर डोसपासून लसीपासून वंचित आहेत.