मुंबई -राज्यात गेल्या दोन वर्षात सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्येक वर्षी अडीच सुमारे हजार शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असताना राज्यातील या भागातील शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी एकही मनोरुग्णालय ( Psychiatric hospital ) या परिसरात नाही. केवळ एक मनोरुग्णालय नागपुरात असून त्या एका मनोरुग्णालयावर सुमारे 24 जिल्ह्यांचा भार पडत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र घाडगे यांनी उघडकीस आणली आहे.
राज्यातील नर्सिंग होम आणि मनोरुग्णालयांची संख्या -राज्य सरकार मार्फत राज्यात 184 खासगी नर्सिंग होम मान्यता देण्यात आली आहे तर चार विभागीय मनोरुग्णालय सध्या कार्यरत आहेत. राज्याच्या सहा महसुली विभागांपैकी पुणे कोकण आणि नागपूर या तीन विभागातच ही मनोरुग्णालय कार्यरत आहेत. त्या उलट अमरावती औरंगाबाद आणि नाशिक या महसुली विभागांमध्ये एकही मनोरुग्णालय कार्यरत नाही. त्यामुळे सुमारे 24 जिल्ह्यांना नागपूर येथे असलेल्या एकाच मनोरुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. या मनोरुग्णालयातील घाटांची संख्या ही केवळ 940 इतकी आहे, अशी माहिती राजेंद्र घाडगे यांनी दिली.
गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही -या 24 जिल्ह्यांमध्ये एकही मनोरुग्णालय नसल्यामुळे मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या रुग्णांना नाईलाजाने खासगी नर्सिंग होममध्ये उपचार घेणे भाग पडते. खासगी नर्सिंग होममधील उपचार या रुग्णांना परवडत नाही. पण, त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने त्यांना या रुग्णालयात उपचार घ्यावेच लागतात, अन्यथा काही रुग्ण थेट मृत्यूला कवटाळतात.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे रुग्णालय -पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी पुणे येथे मनोरुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या खाटांची संख्या 2 हजार 540 इतकी आहे तर कोकण विभागातील मनोरुग्णालय रत्नागिरी येथे आहे. या रुग्णालयातील खटांची संख्या 365 इतकी आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण पाहता या रुग्णालयांवर तितकासा मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या शेतकऱ्यांचा भार पडत नाही.
नवीन मनोरुग्णालयांसाठी प्रस्ताव -मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मनोरुग्णालय असणे आवश्यक आहे. याची जाणीव झाल्यानंतर सरकारने बीड येथे 100 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय प्रस्तावित आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आणखी एक रुग्णालय सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेला विलंब होत आहे.