मुंबई- महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमानुसार मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश नसल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून गेल्या 14 महिन्यात सुमारे 667 दुचाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 17 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, मराठी नंबर असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाईचा कसलाच तपशील वाहतूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश नाहीत हेही वाचा -पाकिस्तानातून कांदा आयात करुन इम्रान खानचे हात मजबूत करा, राजू शेट्टींचा मोदींना उपरोधिक टोला
मुंबई वाहतूक पोलिसांकडून वारंवार मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची अडवणूक केली जाते. अनेक वाहनांवर दादा, नाना, आभार, राज अशा फॅन्सी मराठी नंबर प्लेट अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांवर झळकत असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना दुजाभाव करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीच्या वतीने गोवर्धन देशमुख यांनी वाहतूक विभागाकडे मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे राज्य शासनाचे आदेश असलेली प्रत मागितली होती. पण, तसा कोणताच आदेश नसल्याची माहिती अधिकारातून पुढे आली आहे .
राज्यातील मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर संघराज्य सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाई होत आहे. हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. 1988-89 मध्ये जो कायदा बनवण्यात आला. त्यातील कलम 50 चा दाखला वाहतूक पोलीस देत आहेत. त्यात दंड किती आकारावा हे नमूद केलेले नाही. मग कोणत्या तरतुदीनुसार पोलीस 200 रुपये दंड आकारत आहेत? असा प्रश्न देखील देशमुख यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये - नवाब मलिक
कारवाईचा हा सर्व भोंगळ कारभार सुरू असून जर पोलीस मराठी क्रमांक असणाऱ्या सर्वच वाहनांवर कारवाई करत आहेत. तर मग मराठी पाट्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या कारवाईची माहिती का उपलब्ध होत नाही? असा प्रश्न देशमुख यांनी विचारला आहे. खरे तर ही कारवाई तातडीने थांबवणे गरजेचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन जोपर्यंत मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचा आदेश देत नाही. तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणीही मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.