मुंबई- राज्यात राजकीय बॉम्ब फुटत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुन विरोधकांना जोरदार फटकारले. संपलेल्या नावाला मोठे करुन राजकीय भांडवल करायची गरज नाही. एवढंच होत तर, दाऊदच्या रत्नागिरीतील जागेतच योगा सेंटर का, दुसरीकडे जागा नव्हती का, असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी उपस्थित केला. तसेच या राजकारणात आपल्याला पडायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दाऊदच्या जागेतच योगा सेंटर का..?
मुंबईतील ड्रग्स प्रकरणावरुन सुरू झालेला आरोप-प्रत्योरोपांचा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात जुंपली आहे. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे गंभीर आरोप एकमेकांवर केले जात आहेत. फडणवीस यांनी मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. तर मलिक यांनी दाऊदची मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. याबाबत पत्रकारांनी मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाच्या आरोपाबाबत मलिक खुलासा करत आहेत. आता दाऊदचे नाव घेऊन संपलेल्या नावाला पुन्हा मोठे करणे योग्य नाही. दशहत निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दाऊदची रत्नागिरीतील जागा कोणी घेतली हे सगळ्यांना माहित आहे. तीच जागा का घेण्यात आली. तेथे योगा सेंटर उभारले जाणार असल्याचे समजते. पण, गोळवलकर यांच्या जागेत ही योगा सेंटर झाले असते, पण तेथे का केले नाही. दाऊदच्या जागेत स्मारक का, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला. या प्रकरणात मला पडायचे नसल्याचे ही ते म्हणाले.