मुंबई Ajit Pawar And Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथे नुकत्याच झालेल्या शिबिरामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील महत्त्वाच्या लोकसभेच्या जागा लढणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे निर्देश दिले होते. यामध्ये शिरूर लोकसभा रायगड, सातारा आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांच्या तयारीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट हा आक्रमक झाला आहे. यातील तीन खासदारकीच्या जागा या अजूनही शरद पवार गटाकडे आहेत. काहीही झाले तरी या जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील अजित पवार यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची डाळ शिजणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनता काकाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नेत्याला स्वीकारणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्यांचे म्हणणं आहे.
अजित पवारांना जनता स्वीकारणार नाही: यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस दत्ताजी देसाई म्हणाले की, अजित पवार गटाने गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळे होण्याची गरज नाही. मोदींची लाट असतानाही महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचे नाव असतानाही शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना विजयी करून दाखवले आहे. शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील ताकद अद्यापही कमी झालेली नाही. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग राजकारणात कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष शरद पवारांनी राज्यातल्या जनतेसाठी केलेल्या विविध कामांची जाण जनतेला आहे. त्यामुळे शरद पवार हे त्यांच्याकडे असलेल्या सातारा, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चितच उमेदवार निवडून आणतील. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याची स्वप्ने अजित पवार यांनी पाहू नये. बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राहील. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हे हे अजूनही आमच्यासोबत आहेत आणि या ठिकाणी दिलेल्या उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा निवडून येईल. आजपर्यंत महाराष्ट्रात काकांना धोका देऊन गेलेल्या एकाही पुतण्याला यश मिळाले नाही, असेही देसाई यावेळी म्हणाले.
तर महायुतीत तिढा : अजित पवार (Ajit Pawar) यांनी चार लोकसभेच्या जागा घोषणा केल्यानंतर आता महायुतीतच संघर्षाला सुरुवात होईल. कारण यापैकी दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. तर मावळ मतदार संघ ही शिवसेना सोडणार नाही. त्यामुळे आता हळूहळू महायुतीमध्येच वाद निर्माण होतील असेही देसाई म्हणाले.