मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असताना उपविभागीय रेल्वे (लोकल ट्रेन) सेवा बंद करण्यात आली. अशावेळी बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम केले. मात्र, मिशन बिगीन अंतर्गत शहरातील व्यवहार सुरू झाल्यावरही लोकल रेल्वे बंद असल्याने बेस्ट बसमधील प्रवाशांची गर्दी वाढली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली. टाळेबंदी दरम्यान रेल्वे सेवाही बंद केल्याने बेस्टवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी पारही पाडली. मात्र, आता लॉकडाऊनमधील नियम शिथिल केल्यावर शहरातील व्यवहार सुरू झाल्यावर पुन्हा प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
बेस्टच्या सर्वच बस स्टॉपवर प्रवाशांची गर्दी आणि रांगा पाहायला मिळत आहेत. प्रवासी जास्त आणि बेस्टच्या बसेसची संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने एका बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी आणि उभे पाच प्रवासी हा नियम बाजूला ठेवत गर्दीमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे बेस्टच्या बसेसमधून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेला मिळत आहे. दरम्यान, याबाबत बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
8 जूनपासून गर्दी वाढली
बेस्ट उपक्रमाने अटी-शर्तीवर 8 जुनपासून सर्वसामान्यांसाठी बसेस सुरु केल्या. सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळणे, तोंडावर मास्क लावणे हे नियम प्रवाशांना सांगत एका सिटवर एक प्रवासी व 5 उभे प्रवासी अशी सूचना वाहक व चालकांना केल्या. पण, बेस्ट बसमध्ये एका सिटवर दोन प्रवासी, गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे.
हेही वाचा -पंतप्रधान व प्रतिष्ठित व्यक्तींच्या विडंबनात्मक चित्रांविरोधात भाजपा युवा मोर्चाची तक्रार