महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खबरदार..! जादा दराने जीवनावश्यक वस्तू विकाल तर... - कोरोना बातमी

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे, असे राज्य शासनाने जाहीर केले असून टंचाई भासवून जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. ​

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Apr 5, 2020, 8:28 PM IST

मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशात आणि राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यादरम्यान लोकांमध्ये अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची मुभा सरकारने दिली असली, तरी काही ठिकाणी काळाबाजार करून जास्त दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शासनयंत्रणा खबरदारी घेत आहे, असे राज्य शासनाने जाहीर केले असून टंचाई भासवून जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ​

​जीवनावश्यक वस्तूंच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत राज्य शासनाने ​अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मजूर-कामगारांना प्रवासासाठी पासेस अशा काही उपाययोजनांमुळे, राज्यात लॉकडाऊनच्यानंतर किरकोळ विक्रीची दुकाने, किराणा दुकाने यांच्यासंदर्भात काही प्रमाणात निर्माण झालेली परिस्थिती गेल्या सहा-सात दिवसांमध्ये सुधारल्याचे सांगितले आहे.

अन्नधान्य, खाद्यतेल, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही, असे स्पष्ट करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध आहे, याची ग्वाही शासनाने दिली आहे.

तसेच एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा होत आहे. पुरवठा कामगारांचा तुटवडा असूनही गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यामध्येही गती आली आहे, याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.

​दुधाचाही कोठेही तुटवडा नाही. उलट, दुधाच्या पुरवठा क्षमतेपेक्षा त्याची विक्री कमी होत असल्याचे दिसते आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्यांची आवक वाढली असून शेतकऱ्यांकडून थेट खरेदीही वाढली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री होत असून मोठ्या इमारतींमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही व्यवस्था अजून वाढविण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले आहे.

असंघटीत क्षेत्रातील किराणा दुकाने ही पुरवठा साखळीची अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ही दुकाने उघडी असतील याची दक्षता घेण्यात येत आहे. बहुतेक किराणा दुकाने उघडी असतात आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्यसाठा येण्यास सुरवात झाली आहे. डिटर्जंट आणि साबणाच्या पुरवठ्याबाबत राज्यात कोठेही मोठा तुटवडा नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनांच्या संपर्कात प्रशासन यंत्रणा आहे आणि पुरवठा साखळी सुधारण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. अत्यावश्यक वस्तूंची आणि औषधांची पुरवठा साखळी अबाधित कार्यरत राहण्यासाठी राज्य शासनाने नेमलेला सचिवांचा गट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

स्वस्त धान्य दुकानांमधून वितरण सुरळीत

​गेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 30 टक्के धान्य उचलले आहे. उर्वरित धान्य उचलण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेतील मोफत तांदूळवाटप लवकरच सुरु होईल, असेही शासनाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा -दिवे न लावण्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल...

ABOUT THE AUTHOR

...view details