महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्करोगाबद्दल समाजात वाढली जागृती, मराठी विज्ञान परिषदेत तज्ज्ञांचे मत

२८ एप्रिल रोजी चुनाभट्टी येथे झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीखंडे बोलत होते. कर्करोग रुग्णांनी आपले उर्वरित जीवन सुखमय जगण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी श्रीखंडे यांनी भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आपले विचार सोप्या भाषेत मांडले.

मराठी विज्ञान परिषदेचा वर्धापन दिन

By

Published : May 4, 2019, 1:06 PM IST

मुंबई - कर्करोग म्हटले, की रोग्याचा शेवट होणार हे निश्चित समजले जाते. पण आता कोणत्याही प्रकारच्या रोगावर विविध प्रकारचे संशोधन जगभर केले जाते. रोगी वेळेवर बरा होऊ शकतो, हे आता वैद्यकीय शास्त्राने दाखवून दिले आहे. भारतात कर्करोगाबद्दलची जाणीव समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन टाटा कर्करोग रूग्णालयाचे उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी केले. ते मराठी विज्ञान परिषदेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात चुनाभट्टी येथे बोलत होते.

२८ एप्रिल रोजी चुनाभट्टी येथे झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीखंडे बोलत होते. कर्करोग रुग्णांनी आपले उर्वरित जीवन सुखमय जगण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी श्रीखंडे यांनी भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आपले विचार सोप्या भाषेत मांडले.


कर्करोग म्हणजे काय, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगातील टप्पे, त्याचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, कर्करोगाच्या विविध उपचारपद्धती, त्यामध्ये झालेल्या सुधारणा, भाभाट्रॉन हे रेडिएशन थेरपीसाठी भारतात तयार केलेले संयंत्र, विविध क्षेत्रातील डॉक्टरांचा एक गट म्हणून काम करण्याची गरज इत्यादी गोष्टींचा ऊहापोह डॉ. श्रीखंडे यांनी केला. कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूसेवन वर्ज्य करणे, स्थूलपणा कमी करणे, नियमित व्यायाम करणे इत्यादी बाबींवर भर दिला गेला पाहिजे. कर्करोगाचे प्रमाण वाढले असले तरी कर्करोगासंबंधी जागरूकतासुद्धा वाढलेली आहे असा सकारात्मक विचार यावेळी श्रीखंडे यांनी मांडला.

मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी अनेक संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांची माहिती यावेळी दिली. शेतीतील उत्पादकता वाढवणे, सौर ऊर्जेचा वापर करून चालणारा कुकर तयार करणे, कमी खर्चाची पाणी शुद्धीकरण यंत्रणा विकसित करणे असे संशोधन प्रकल्प परिषदेने यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे सांगितले. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह डॉ. जयंत जोशी यांनी ई पुस्तके व बोलक्या पुस्तकांच्या उपक्रमाची माहिती यावेळी सांगितली.


तसेच 'रानातली गोष्ट, मनातली गोष्ट' या डॉ. नंदिनी देशमुख लिखित पुस्तकाच्या बोलक्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मराठी विज्ञान परिषद प्रकाशित 'शहरी खेती कैसे करें?' या हिंदी अनुवादाचे प्रकाशन परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते झाले. डॉ. नघा वक्टे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .या मराठी विज्ञान परिषदेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात विज्ञानप्रेमींनी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details