मुंबई - स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतचे काँग्रेस राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी वाखाण्याजोगे काम केले. काहींना याचे विस्मरण होऊ लागले आहे. परंतु, ७५ वर्षांत केलेले काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व पध्दतीने येत्या काळात काम करायचे आहे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदोत व हे स्वातंत्र्य असेच तेवत राहो, अशा शब्दांत गृहमंत्री पाटील यांनी राज्यातील जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या.
'पुढचा स्वातंत्र्य दिन यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने'
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतानाच कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. दीड वर्षांत सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी आपत्तीवर मात करण्याचे काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे. पुढचा स्वातंत्र्य दिन आपल्याला यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल, अशी अपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.