मुंबई -पालिकेने कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष जगू शकतात याचा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केली आहे. शहरात वृक्ष पडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष जगू शकतात याचा अभ्यास करूनच वृक्ष लागवड केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
चेंबूर येथील कांचन नाथ व शारदा घोडेस्वार यांचा झाड पडून दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. एखाद्या ठिकाणी कोणते झाड लावल्यावर ते जगेल आणि मोठे होईल, झाडाची मुळे जमिनीत खोलवर गेल्यावर कालांतराने ते झाड पडणार नाही, याचा कोणताही अभ्यास पालिकेने केलेला नाही. कोठेही कोणतीही झाडे लावली जातात. कालांतराने अशी झाडे पडतात. झाडे जगवायची असतील आणि दुर्घटनाही टाळायच्या असतील तर पालिकेने वृक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा, अशी मागणी शितल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.